अपयशाचे भ्रम नष्ट करा | Apayashache bhram nasht kara

 ● अपयशाचे भ्रम नष्ट करा :-

.........................................................


     अपयश हा यशाचा महामार्ग आहे. टॅाम वॅाटसन(सीनिअर) म्हणतात, “ तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्र्यत्नांचा- ते असफल ठरत असले तरीही- वेग दुप्पट करा.” इतिहासाचा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपणास असं दिसून येते की सर्व यशोगाथा या मोठ्या अपयशांच्याही कहाण्यां आहेत. या माणसाला २१ व्या वर्षी व्यवसायात खोट आली, २२ व्या वर्षी तो विधीमंडळाची निवडणूक हारला, २४ व्या वर्षी परत तो एकदा व्यवसायात तो अपयशी ठरला, २६ व्या वर्षी त्याच्या पत्नीचे निधन झाल्याचे दु:ख त्याला पचवावे लागले, २७ व्या वर्षी नैराश्याने तो फार खचून गेला, वयाच्या ३४ व्या वर्षी तो संसदीय विधीमंडळाची निवडणूक हारला, ४५ व्या वर्षी तो सिनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला, ४७ व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले, ४९ व्या वर्षी आणखी एकदा सेनेटवर निवडून येण्यात तो अयशस्वी झाला, ४९ व्यां वर्षी आणखी सेनेटवर निवडून येण्यास तो अयशस्वी ठरला. आणि ५२ व्या वर्षी तो अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आला. हा माणूस म्हणजे आब्राहम लिंकन.

तात्पर्य :-लिंकनच्या दृष्टीने अपयश ही तात्पुरती माघार होती, तो अंतिम टप्पा नव्हता  


     अपयशाने कठोर परीश्रमावर पाणी पडते. डॉक्टर फोर्डच्या मतानुसार -“ अयशस्वी होणे अगदी सहज शक्य आहे. पण यशासाठी जीवाचे रान करावे लागते. अपयश फुकटात पदरात पडते. पण यशासाठी तुमचे सर्वस्व अर्पण करावे लागते.’ अपयशाचे दुसरे कारण म्हणजे एखादी गोष्ट टाळणे किंवा त्याबद्दल धरसोड वृत्ती ठेवणे, चाल ढकल करणे, ठोस असा निर्णय न घेणे, संकटांना, अडचणींना किंवा समस्याना समोरासमोर तोंड न देता अनिष्ट मार्गाचा अवलंब करणे, सुस्पष्ट नियोजनाचा अभाव एखाद्या गोष्टीची कार्यवाही अर्थवट,घाईघाईने करणे. प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव , एखादी गोष्ट आपल्यासाठी दुसरे कोणीतरी करतील म्हणून पलायनवादी दृष्टीकोन स्वीकारणे. आपले सहकारी, मित्र, वरिष्ठ ,समाज यांच्या दबावामुळे आपल्या कार्यक्रमात बदल करून आत्मघातकी निर्णय घेणे. झटपट यश मिळविण्यासाठी अतिरेकी व चुकीच्या मार्गाचा वापर करणे. सहनशीलता किंवा सोशिकतेचा अभाव- कष्ट,परिणाम यांचा ताण सहन  करण्याची क्षमता नसणे.


     एडिसन एका किचकट प्रश्नांवर अनेक वर्ष रांत्रदिवस संशोधन करीत होते. त्याच्या एका सहकाऱ्यास पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एडिसनच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. एडिसनने ती समस्या सोडविली अशी त्याची भावना होऊन त्याने म्हटले, “सर तुम्ही  महान आहात, तुम्ही ती किचकट समस्या सोडविलीत. तुमच्या दीर्घ कष्टाचे फळ तुम्हास मिळाले” एडिसनने शांत चेहरा ठेवून उत्तर दिले “ मित्रा मी चुकीच्या पद्धतीने त्या प्रश्नाची उकल करीत होतो. आता मी नव्याने ती समस्या सोडविण्यास सुरुवात करणार आहे.”

तात्पर्य :- एडिसनची सहनशक्ती त्यास महान बनवून गेली.”