Raja Janak and Ashtavakra | राजा जनक आणि ऋषि अष्‍टावक्र बोध कथा

राजा जनक आणि ऋषि अष्‍टावक्र    
Raja Janak | Status Century

राजा जनक राजा असूनही त्‍यांना राजवैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे. एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला. अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ 
                                                 राजा जनक आणि ऋषि अष्‍टावक्र | Status Century

अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्‍हणणे आहे. मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवा त्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’ 

 तात्‍पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.