शेंडी चा तह | Shendi cha tah Marathi Stories

 शेंडी चा तह

सोहम पाटिल


 

अखेर या युद्धाचा शेवट झालाच. प्रयत्नांची पराकाष्ठा केली.  प्राण, प्रतिष्ठा पणाला लावली होती. बाहेरून पाहता कोण्या सामान्य मनुष्याने साध्या  निरीक्षणाने सुद्धा हाच अंतिम निकाल येणार आहे असा अंदाज वर्तवला असता.

कारण दोन्हीं पक्षांच्या कौशल्यां मध्ये कमालीची तफावत होती. विरोधी पक्षा कडे एक  राजनीती तज्ञ( पिताश्री) ; अनुभवी गृहमंत्री ( मातोश्री)  , आणि एक असिस्टंट होता( ताईसाहेब). आणि मी एकटा होतो. रणनीती तयार करणे तिची अंमलबजावणी करणे आपल्या मागण्या मांडणे हे सर्व मला च करावे लागत होते.  एकंदरीत पाहता तिन्ही आघाड्यांवर मलाच लढा द्यावा लागत होता. इतिहासाची पुस्तके चाळली तर या परिस्थिती शी मिळती जुळती परिस्थिती तुम्हाला हिटलरच्या बाबतीत पहायला मिळेल त्याने सुद्धा एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई सुरू केली होती .एका बाजूला रशिया तर दुसरी कडे इंग्लंड  फ्रान्स....आणि निकाल तर तुम्हाला माहिती च आहे....


परिस्थिती चं बारीक विश्लेषण  केलं तर लक्षात येईल की या संघर्षा ची पाळेमुळे आपल्याला २०२० च्या मार्च महिन्यात मी टक्कल केले होतं त्यात सापडतील. सुरुवातीला याचे तसे काही परिमाण जाणवले नाहीत किंवा पुढे जाऊन या वर लढाई होईल असा अंदाज वर्तवणे सुद्धा कोणाला शक्य न्हवते..

जस जसा वेळ गेला काही महिने गेले. तशी शेंडी ची वाढ जोमाने झाली होती...हिरव्या गवताच्या माळरानावर एकटे सूर्य फुल ज्या डौलात उभं अस्त त्या प्रमाणे माझी शेंडी अगदी जोमात उभी होती आणि नेमकी हीच गोष्ट विरोधी पक्षा ला पटली नाही. शेंडी कापायची की नाही यावर मित्र पक्षात फूट पडली आणि ३ vs १ असे गट निर्माण झाले.

      आणि नंतर सुरू झाली अप्रत्यक्ष लढाई. राजकीय डावपेच कट कारस्थाने....प्रत्येक जण आपली खेळी खेळत होता. मी विरोधी पक्षाच्या प्रत्येक  चालीचं अत्यंत शिताफीने प्रत्युत्तर देत होतो..माझ्या परीने तीव्र प्रतिकार करत होतो. विरोधी पक्षातील एक  कमजोरी माझ्या निदर्शनास आलेली होती. त्यांच्यात एक कमोजर कडी होती ती म्हणजे असिस्टंट ( ताईसाहेब).

असिस्टंट आणि त्यांच्यात पण  लॅपटॉप नावाच्या प्रदेशाच्या खरेदी वरून मतभेद निर्माण झालेले होते.

असिस्टंट च म्हणणं होत की त्यांना  अंदाजे  ७० - ८० हजार किमतीचा प्रदेश हवा होता. तर गृहमंत्री आणि राजनीती तज्ञ  यांचं म्हणणं होत की ते केवळ ५० हजार किमतीची मंजुरी देऊ शकतात.परंतु या शेंडी च्या लढाईत हे मतभेद बाजूला राहिले होते....परंतु ते होते च.

मी याचा फायदा घ्यायचा ठरवले. हा पत्ता राखून ठेवायचां आणि बाकी पर्याय वापरायचे अस मी ठरवलं....सर्व पर्याय निकामी ठरले की हे ब्रह्मास्त्र मी वापरणार होतो.


दिवसांवरून दिवस जात होते .विरोधी पक्ष हळू हळू त्यांचा पंजा कसत होता. अचानक एक दिवशी त्यांच्या हालचालींनी तीव्र वेग घेतला. माझा प्राथमिक अंदाज होता की गनिमी कावा याचा वापर करून हे  मला बेसावध बघून हल्ला करणार त्यामुळे त्यांची हत्यारे ( कात्री) मी लपवून ठेवले. हुडी चा टी शर्ट घातला आणि तिची टोपी घालून बसलो. माझा अंदाज खोटा ठरला त्यांची धावपळ ही गुप्त बैठकी साठी चालली होती. 

बैठक वरच्या अंगाला असलेल्या गढी मध्ये होती.

तब्बल तास भर त्यांची बैठक चालली. गुप्तहेरांनी दिलेल्या बातमी नुसार आता विरोधी पक्ष आपली रणनीती बदलत होता. त्यांनी वेढा देऊन माझे सर्व स्त्रोत घोटावायचे असे ठरवले होते.  मी सुध्धा तयार होतो माझ्या कडे वयक्तिक १ महिना पुरेल  एवढी रसद शिल्लक होती. 


आणि अखेर त्यांनी तिन्ही बाजूने वेढा टाकलाच. राजनीती तज्ज्ञ यांनी दळण वळणाच्या संसाधनांवर निर्बंध आणले. अत्यंत टोकाच्या परिस्थिती मध्ये च दुचाकी वापरण्याची परवानगी देण्यात आली. आर्थिक मदत बंद करण्यात आली. गृहमंत्र्यांनी  आपला डाव स्वयंपाक घरात कसला..... काजू बदाम यांच्या डब्याच्या जागा बदलण्यात आल्या. तूप करायचं आहे हे कारण देऊन दुधाची साय खाण्यावर निर्बंध लादले गेले. माझ्या आवडीचे पदार्थ स्वयंपाकघरातून हळू हळू लुप्त होऊ लागले. टमाटयाची चटणी; कांद्याची पात यांची जागा आता ढब्बू मिरची, कारलं, कोबी फ्लॉवर यांनी घेतली होती. चिकन आणि अंडी यांच्या वर तर  घर आणि १० मीटर भोवतालच्या परिसरात बंदी च घातली गेली होती.

असिस्टंट यांना वायफाय चा पासवर्ड बदलण्याचं निर्देश देण्यात आले होते. तब्बल दोन महिने मी गड लढवला आता मात्र माझी सहनशक्ती पूर्ण पणे संपली होती. 


मी स्वतः हुन विरोधी पक्षा समोर चर्चे चा प्रस्ताव मांडला.

बैठकी ची वेळ ठरली आणि दोन्ही बाजूच्या उच्चस्तरीय नेत्या मध्ये तब्बल २  तास   चर्चा चालली वाद झाले वातावरण गरम झालं. वरोधी पक्ष सोल्जर कट करायचा  या मागणी वर आडून बसला होता. शेवटी मी माझं ब्रह्मास्त्र चालवलं आणि त्या अस्त्राने बरोबर काम केलं.

सोल्जर कट  ऐवजी  वन साईड कट ला परवानगी दिली .

शेंडी कापली जाईल या अटी वर.


इसवी सन २०२०  सप्टेंबर  २५ रोजी झालेला हा तह इतिहासात शेंडी चा तह म्हणून ओळखला जाईल.


शेंडी च्या तहातील प्रमुख मुद्दे : -


१) दळणवळणाची साधने व त्यांचा वापर पूर्वरत केला जावा.


२) काजू बदाम यांची जागा बदलण्यात येणार नाही.


३) आठड्यातून एक वेळी चिकन एक वेळी अंडी पुरवली जातील.


४) मासिक आर्थिक सहाय्य पुरवले जाईल. शैक्षणिक व वयक्तिक गरजेनुसार भत्ते दिले जातील.


५) करारावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या नंतर च्या चोवीस तासांत शेंडी कापली गेली पाहिजे.



अशा रीतीने जिला मी माझ्या डोक्यावर मानाचं स्थान दिलं होतं  तिला आज संपवून आलो. माझ्या शेंडी ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 

शोकाकुल समस्त: कंगवा परिवार, हेयर बेल्ट काकू, छोटू दाढी वाले


तुम्ही देखिल तुमचे मराठी भाषेतील साहित्य आपल्या वेबसाइट वर पोस्ट करू शकता , ईमेल द्वारे संपर्क साधावा.