मला हवीयेस तू..
किती वेळ झोपलीयेस.. उठ की..
मला हवीयेस तू.. आत्ता..
त्यानं पुन्हा एकदा तिला उठवायचा प्रयत्न केला..
ती तशीच... शांत पहुडलेली..
कोणताच प्रतिसाद न देता
ती हे मुद्दाम करतीये असाच होरा होता त्याचा..
कितीदा हाका मारायच्या तिला??
त्याची चीडचीड आता काळजीत बदलू लागली..
तिनं ही अस्पष्ट हालचाल दाखवल्याचा भास झाला..
पण ते ही आभास आहेत हे लवकरच कळलं त्याला
तो मदती साठी बाहेर धावला..
घराबाहेर पडून आरडाओरड करून झाला पण कुणीच त्याचं ऐकायला नव्हतं..
ती आता उठून बाहेर आली..
लग्नात नेसलेल्या त्याचं किरमिजी नऊवारीतलं तिचं साजिरं रूपं..
त्यावर जांभळ्या रंगाचं डिझायनर ब्लाउज, केसांचा खोपा त्यावर माळलेली नाजूक जाईची वेणी, मोत्यांचे वेल, कानात झुबे, गळ्यात मुहूर्तमणी, चिंचपेटी, मोत्याचा आणि सोनमण्यांचा सर, आणि त्यानं घातलेले ठसठशीत मंगळसूत्र..
तिच्या पिंगट मोठ्या डोळ्यांत भरलेलं काजळ, नाकातली हिऱ्याची चमकी, मोठ्ठया कपाळावर मेण लावून लावलेलं कुंकू नी हळदीची भरीव वर्तुळ..
गालावर मनातल्या इश्श्य नी उमटलेलं गुलाबी रंग
ही अशी तयार होऊन कशी काय बाहेर आली..??
ती त्याला ओलांडून आर पार गेली..
तो पाहातच राहिला..
ती घरासमोरच्या तुळशीपाशी आली नी मागे वळून त्याच्या कडें पाहिलं..
तो तिथेच कोसळला..
आणि मग काही क्षणांत तो ही वर वेषात बाहेर आला.. तिचा हात हातात घेतला.. तिनं लाजून खाली पाहिलं..
##तिच्या आजारपणाला कंटाळून त्यानंच तिला जेवणात विष घातलं होतं.. आणि शेवटचे दोन घास खाऊन तो मगाशी तिच्या जवळ आला होता . ती शांतपणे गेली आणि ती अशी परयोनीत पाहून तिचा विरह सहन न होऊन तो ही गेला... तिच्याबरोबर.. कायमचा......
